खेड, दि. १५ जुलै: खेड तालुक्यातील लोटेमाळ येथील बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी करून लॅपटॉप, डॉक्युमेंट स्कॅनर आणि सुटकेससह एकूण ४५,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना १३ जुलै २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संदेश दिलीप खरात (वय ३६, सध्या रा. श्रमसाफल्य अपार्टमेंट, रावतळे, चिपळूण) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, १३ जुलै रोजी सायंकाळी ४.३० ते रात्री ८.४५ वाजण्याच्या दरम्यान ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्याने बँकेच्या कॅशिअर केबिनच्या मागील बाजूला असलेल्या स्लायडिंग खिडकीची काच लोखंडी कटावणी, हातोडा आणि एक्झा ब्लेडच्या साहाय्याने फोडली. त्यानंतर खिडकीबाहेरील लोखंडी ग्रील तोडून वाकवून आत प्रवेश केला.
बँकेच्या कार्यालयातून चोरट्याने ४०,००० रुपये किमतीचा सिल्व्हर रंगाचा एच.पी. कंपनीचा लॅपटॉप (HP 245 14 inch G9 NOTEBOOK PC/RCTO UMA/RYZEN55625/RAM 16GB), ५,००० रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा एच.पी. डॉक्युमेंट स्कॅनर आणि ५०० रुपये किमतीची चॉकलेटी रंगाची मोठी सुटकेस असा एकूण ४५,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
या घटनेची माहिती मिळताच, १४ जुलै रोजी दुपारी ३.५० वाजता खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३३१ (३), ३३१ (४) आणि ३०५ प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा (गु.र.नं. २२६/२०२५) दाखल करण्यात आला आहे. खेड पोलीस या घरफोडीचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:40 15-07-2025














