रत्नागिरी, दि. १५ जुलै : रत्नागिरी शहरात कासारवेली ते साखरतर रोडवर, प्रसादे डॉक्टरांच्या दवाखान्यासमोर एका तरुणाला किरकोळ वादातून मारहाण करण्यात आली. या घटनेत गौरव संतोष शिंदे (वय ३२) या तरुणाच्या डोक्यात लोखंडी सळीने वार झाल्याने तो जखमी झाला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १३ जुलै २०२५ रोजी रात्री ११.३० वाजता घडली. फिर्यादी गौरव शिंदे हे त्यांच्या कासारवेली येथील मेव्हण्या भूषण परशुराम शिरगावकर यांच्या घरी जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर ते सिगारेट ओढत उभे असताना, अक्षय माने (रा. गवळीवाडा, रत्नागिरी) हा तिथे आला. त्याने गौरव शिंदे यांना “तू बाजूला हो, तू इथे का उभा आहेस?” असे बोलण्यास सुरुवात केली. शिंदे यांनी “मी सिगारेट ओढत आहे” असे सांगितल्यावर अक्षय माने याला राग आला.
त्यानंतर अक्षय मानेने गौरव शिंदे यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. यावेळी त्याच्यासोबत असलेला सिद्धार्थ विठ्ठल लाकडे (रा. कासारवेली, रत्नागिरी) यानेही शिंदे यांना हाताने मारहाण केली आणि त्याच्या हातात असलेली लोखंडी सळी गौरव शिंदे यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. “मी तुला बघून घेईन,” अशी धमकीही आरोपींनी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर गौरव शिंदे यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात १४ जुलै रोजी सकाळी ११.०४ वाजता फिर्याद दिली. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), आणि ३०५ प्रमाणे अक्षय माने आणि सिद्धार्थ लाकडे यांच्याविरुद्ध गुन्हा (गु.र.नं. ३२१/२०२५) दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:46 15-07-2025














