प्लास्टिकमुक्त चिपळूणसाठी होम मिनिस्टर स्पर्धा

रत्नागिरी : चिपळूण शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी महिलांसाठी आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चिपळूणमधील गृहिणी चिपळूणची होम मिनिस्टर होणार आहेत.

या स्पर्धेकरिता १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०२५ हा एक महिन्याचा कालावधी असून चिपळूण शहरातील सर्व महिलांसाठी स्पर्धा खुली आहे.

स्पर्धेकरिता महिन्यातून १५ दिवस प्लास्टिक जमा करावे. प्रत्येक वेळेस स्पेशल कुपन्स दिली जातील. प्रत्येक सहभागी महिलेला प्रमाणपत्र दिले जाईल. कुपनमधून लकी ड्रॉद्वारेच विजेत्या महिलेला मानाची पैठणी प्रदान केली जाईल. तसेच अंतिम विजेत्या महिलेला सोन्याची नथ दिली जाईल. लकी ड्रॉच्या दिवशी खास ‘होम मिनिस्टर’ खेळ खेळला जाईल.

या मोहिमेत इतर महिलांना सहभागी करून घेणाऱ्यांनाही विशेष प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांकरिता प्लास्टिक जमा करण्यासाठी नागरिकांच्या दारी गाडी जाईल. त्यामध्ये प्लास्टिक जमा करायचे आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मेसेज आल्यानंतर गाडी येईल. प्लास्टिक घेऊन जाईल आणि कुपन देऊन जाईल.

महिलांनी नोंदणीसाठी ७२७६० ४१७०१ या क्रमांकावर व्हॉट्स अॅप मेसेज पाठवावा. त्यामध्ये नाव आणि सविस्तर पत्ता नमूद करावा.

ही स्पर्धा चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विशाल भोसले, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे भाऊ काटदरे आणि चिपळूण नाटक कंपनीचे मानस संसारे यांनी आयोजित केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:06 15-07-2025