संगमेश्वर : मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर

देवरुख : संगमेश्वर तालुक्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. यामुळे मंगळवारी देवरुख संगमेश्वर मार्ग बंद झाला होता.

सोमवारी दिवसभर व रात्री देखील संगमेश्वर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत होता. यामुळे तालुक्यातील नद्यांनी रौद्र रूप धारण केले. सर्वच नद्यांना पूर आला आहे. संगमेश्वर बाजारपेठेमध्ये मंगळवारी सकाळी पुराचे पाणी घुसल्यामुळे व्यापाऱ्यांची एकच त्रेधातिरपीट उडाल्याचे पाहायला मिळाली.

कसबा परिसराकडे जाणाऱ्या मार्गावरच नदीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे हा मार्ग काही काळ बंद होता. याचबरोबर देवरुख संगमेश्वर मार्गावरील बुरंबी गेले वाडी या ठिकाणी नदीचे पाणी पूर्णपणे रस्त्यावरून वाहत असल्याने संगमेश्वरकडे जाणारी संपूर्ण वाहतूक बंद झाली होती. ही वाहतूक दुपारनंतर सुरू करण्यात आली. यामुळे लांब पल्ल्याच्या संगमेश्वरवरून पुढे जाणाऱ्या एसटी बसेस पांगरी मार्गे वळवण्यात आल्या होत्या. पावसाने दुपारनंतर शांतता घेतल्यामुळे नद्यांचे पूर ओसरून वाहतूक सुरळीत झाली. मात्र या पुरामध्ये कोणतीच हानी झाली नसल्याचे वृत्त आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 16/Jul/2025