कशेडी बोगद्यात अंधार !

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगद्यातील दोन्ही मार्गिकांमध्ये रात्रीच्या वेळेस पथदीप बंद असल्याचे दिसून येत असून, त्यामुळे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर व रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यांना जोडणाऱ्या या महत्त्वाच्या बोगद्यातून प्रवास करताना वाहनचालकांना भीषण अंधाराचा सामना करावा लागत आहे.

मुंबईकडे आणि गोव्याकडे जाण्यासाठी स्वतंत्र असलेल्या या मार्गिकांमध्ये विद्युत दिवे न लागल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. प्रवासी आणि वाहनचालक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अंधारामुळे जीवावर बेतू शकते, असा संतप्त सूर व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील हे काम अद्याप पूर्ण झाले नाही. पथदीपांसारख्या मूलभूत सुविधाही कार्यान्वित न होणे म्हणजे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे द्योतक असल्याची टीका होत आहे. कशेडी घाट परिसर हा कोकणातील वाहतूक दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असून अशाठिकाणी सुरक्षा उपाययोजना कार्यरत नसल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाहनचालकांचे प्राण टांगणीला लागण्याऐवजी प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून दिवे कार्यान्वित करावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग हा कोकणवासीयांचा प्रश्न आता अधिक धारदार झाला आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीयनि लक्ष देणे आवश्यक आहे. अजूनही प्रशासन दुर्घटनेची वाट पाहतेय का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांतून उपस्थित होत आहे.

कशेडी बोगद्यातून प्रवास सुखकर झाला असला तरी अंधाराचे साम्राज्य असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. वीजपुरवठ्याअभावी वाहनचालकांची फसगत होत आहे. बोगद्यात मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का?, यावर तत्काळ कायम स्वरूपात उपाययोजना करण्याची गरज आहे – प्रसाद गांधी, संस्थापक, मदत ग्रुप खेड

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 16/Jul/2025