रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील पाचल येथील हनुमाननगर परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका जुगाराच्या अड्ड्यावर राजापूर पोलिसांनी छापा टाकत एका व्यक्तीला रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई काल, १५ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.५८ वाजताच्या सुमारास हनुमान मंदिराच्या रोडवर करण्यात आली.
या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई रामकृष्ण ज्ञानदेव कात्रे (वय ३४, पोशि/१०५०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विजय दिनकर मोहिते (वय ४२, रा. पाचल, पेठवाडी, ता. राजापूर) याच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा (गु.र.नं. १३३/२०२५) दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय मोहिते हा हनुमान मंदिराच्या रोडवर बेकायदेशीर आणि परवान्याशिवाय कल्याण मटका जुगाराचा खेळ खेळवत असताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ९३० रुपये रोख रक्कम आणि इतर जुगाराचे साहित्य असा एकूण ९३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राजापूर पोलिसांनी जुगाराविरोधात केलेल्या या कारवाईमुळे परिसरात अवैध धंद्यांना चाप बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 16-07-2025














