रत्नागिरी, ता. १५ : आगामी गणेशोत्सव आणि जन्माष्टमी सणांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दलाने मंगळवार, १५ जुलै २०२५ रोजी चंपक मैदानावर व्यापक दंगल नियंत्रण सरावाचे (मॉब कंट्रोल एक्सरसाईज) आयोजन केले. कोणत्याही संभाव्य कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला प्रभावीपणे हाताळण्यासाठी पोलीस दलाची सज्जता तपासणे हा या सरावाचा मुख्य उद्देश होता.
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास चंपक मैदानावर एकावर एक अशा अनुधुरांच्या नळकांड्या फोडल्या जात होत्या. सर्वत्र धूर पसरत होता. ध्वनिक्षेपकावर दंगल काबूत आणणाऱ्या पोलिसांना “चार्ज” करण्याचे आदेश दिले जात होते, तर बंदूकधारी कर्मचाऱ्यांना “फायर…” असे आदेश मिळत होते. मात्र, ही कोणती खरी दंगल नव्हती, तर पोलिसांची रंगीत तालीम सुरू होती.
राखीव पोलीस निरीक्षक राजेंद्र कुळासंगे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे एक तास हा सराव चालला. पोलीस मुख्यालयातील ९० कर्मचाऱ्यांसाठी खास आयोजित करण्यात आलेल्या या सरावाचे पोलीस मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी बारकाईने निरीक्षण केले. या सरावात एकूण ९० पोलीस कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या जोडीला ४ वाहने, ९० लाठ्या, ९० हेल्मेट, ३० शील्ड (ढाली), १० एसएलआर (SLR) रायफल्स, १ मेगाफोन, ९० गॅसगन, १ पॉईंट २/२ रायफल, १ स्ट्रेचर आणि ११२ बोअर रायफल अशा विविध साधनांचा वापर करण्यात आला.
या सरावादरम्यान, पोलिसांच्या दंगल नियंत्रणाच्या क्षमतेची प्रत्यक्ष चाचणी घेण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला एक अनुधुराची नळकांडी फोडण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या सरावामुळे आगामी सणांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रत्नागिरी पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसून आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 16-07-2025














