गुहागर : महाराष्ट्र शासनातर्फे बालकांना पोषण आहार देण्यात येतो. मात्र, पोषण आहाराच्या पाकिटाची एक्सपायरी डेट (पदार्थ वापरण्याचा कालावधी) पूर्ण होण्याआधीच शासनाच्या पोषण आहार खिचडीची पॅकेट कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये आढळून आली. याबाबत मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी याची दखल घेऊन शुक्रवारी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. यानंतर या विषयाची सखोल चौकशी सुरू झाली आहे.
दरम्यान, शुक्रवारी त्या विभागाच्या सुपरवायझर यांना यासंबंधी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आतापर्यंत ५३ लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली आहे. उर्वरित लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाल्यानंतर पोषण आहाराची पॅकेट कोणी फेकली याची माहिती उपलब्ध होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी दिली.
या बाबत भिलारे यांनी सांगितले की, त्या विभागांमध्ये लाभार्थ्यांची मोठी यादी आहे. येत्या दोन दिवसांमध्ये संपूर्ण अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर हे कृत्य कुणी केले आहे याची आपल्याला माहिती उपलब्ध होईल. दरम्यान, गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी घटनास्थळी जाऊन त्या पॅकेटचीपाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवलकर, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होत्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 16/Jul/2025














