मंडणगडात सावित्री नदीसह भारजा, निवळी नद्यांना रौद्र रूप

मंडणगड : जुलै महिन्यात काही दिवस विश्रांतीनंतर पावसाने तालुक्यात जोरदार पुनरागमन केल्याने मंगळवारी तालुक्यात सरासरी ११४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. पावसाळी हंगामास सुरुवात झाल्यापासून १५ जुलैअखेर तालुक्यात एकूण १४०२.५ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.

पावसाने तालुक्यात जोरदार हजेरी लावल्याने सावित्री या मुख्य नदीसह भारजा, निवळी या उपनद्या व गावागावातील ओढे व पऱ्यांमध्ये पाण्याची पातळी वाढली व ते दुथडी भरुन वाहिल्याने गावागावातील लहान मोऱ्या व पुलांवरुन पाणी गेल्याने ग्रामीण भागाचा तालुक्याच्या ठिकाणी असलेला संपर्क काही काळासाठी तुटला. सोमवारी रात्रीनंतर तालुक्यात पावसाने खऱ्याअर्थाने रौद्ररुप धारण केले. पावसाची संततधार सुरु झाली व मंगळवारी दिवसभर कमी अधिक प्रमाणात सुरु राहिली. पावसामुळे तालुक्यातील केळवत, तुळशी, शेनाळे, पालवणी, उमरोली या घाटांमधील माती रस्त्यावर वाहून आला. मात्र त्याचा परिणाम वाहतुकीवर दिसून आला नाही.

भिंगळोली येथे मुख्य रस्त्यासह आजुबाजूच्या परिसरात पाणी शिरले. ग्रामीण भागात अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने विद्यार्थ्यांची शाळेची अडचण झाली. समर्थ नगर येथील
घरांभोवती प्रमाणात पाणी साचले.

शहरातील शाळा महाविद्यालये सुरु होती. ग्रामीण भागात मात्र काही ठिकाणी शाळांना सुट्टी देण्यात आली. पंदेरी, अडखळ, वलैते, लाटवण, विसापूर, चिंचघर मार्गावरील स्थानीक बसफेऱ्या बंद असल्याची माहीती आगार व्यवस्थापनाने दिली आहे. तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल विभागाच्या माध्यमातून सुरु करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 16/Jul/2025