रत्नागिरी : रत्नागिरी येथून सायंकाळी ६ वाजता मजगावमार्गे फणसवळे येथे जाणारी बससेवा त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी फणसवळे ग्रामस्थांनी एसटी विभागाला निवेदन दिले आहे. ही बससेवा तात्काळ सुरू न झाल्यास १ ऑगस्ट २०२५ पासून रत्नागिरी बस स्थानकात उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
फणसवळे ग्रामस्थांनी यापूर्वी २० जून २०२५ रोजी एसटी विभागाला पत्र पाठवले होते आणि प्रत्यक्ष चर्चाही केली होती, तरीही बससेवा अजूनही सुरू झालेली नाही. शाळेत आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची यामुळे मोठी गैरसोय होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
निवेदन देताना फणसवळे सरपंच निलेश लोंढे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष आबेकर, ग्रामस्थ मुकेश माने, रामचंद्र आबेकर, गौरव नाखरेकर आदी उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:
रत्नागिरी येथून सायंकाळी ६.०० वाजता सुटणारी मजगावमार्गे फणसवळे बस त्वरित सुरू करावी.
रत्नागिरी बसस्थानकामध्ये फणसवळे बस सुटण्याचा प्लॅटफॉर्म दर्शवणारा फलक सध्या ग्रामीण (सर्व्हिस) बस सुटतात त्या ठिकाणी लावण्यात आला आहे. तो फलक ज्या प्लॅटफॉर्मवरून फणसवळेकरिता शहरी बस सुटतात, त्या ठिकाणी लावावा.
या मागणीची दखल घेऊन एसटी विभागाने बससेवा त्वरित सुरू करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. अन्यथा, १ ऑगस्टपासून होणाऱ्या उपोषणाची जबाबदारी एसटी प्रशासनाची असेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 16-07-2025














