दापोली : कोकणातील दुर्मीळ होत चाललेली जैवविविधता वाचवणं, ही काळाची गरज आहे, असे मत उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त केलं. दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील महामाईनगर येथे आयोजित केलेल्या कोकण दीपकाडी महोत्सवात ते बोलत होते.
दीपकाडी या दुर्मीळ वनस्पतीचे संवर्धन आणि शेतकऱ्यांपर्यंत या वनस्पतीचं महत्त्व पोहोचवण्यासाठी या दीपकाडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांनी दीपकाडीच्या नैसर्गिक अधिवासाला भेट देत प्रत्यक्ष सड्यावर जाऊन वनस्पतींचं निरीक्षण केलं. या महोत्सवाला पोलिस निरीक्षक महेश तोरस्कर, वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी डॉ. अमित मिरगळ यांनी सांगितले की, कोकण दीपकाडी ही वनस्पती सह्याद्रीच्या सड्यावर आढळते १७५ वर्षापूर्वी एका ब्रिटिश शास्त्रज्ञाने तिचा शोध लावला होता. परंतु, काळाच्या ओघात या वनस्पतीकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यात दुर्मीळ होत चाललेल्या दीपकाडीला चांगले दिवस येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. वन विभाग, वाइल्ड अॅनिमल अॅड रेस्क्यू आणि सह्याद्री संकल्प सोसायटी यांच्या संयुक्त प्रयत्नातून या वनस्पतीच्या पुनर्स्थापनेचं मोठं अभियान राबवण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली
प्रचार-प्रसाराचा निर्धार
दीपकाडी महोत्सवात मार्गदर्शन, प्रत्यक्ष पाहणी आणि माहिती सत्राद्वारे जनजागृती करण्यात आली. भविष्यामध्ये दीपकाडीचं अधिक प्रमाणात संवर्धन व प्रचार प्रसार करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला
दापोलीच्या सड्यावरही या दुर्मीळ वनस्पतीचे दर्शन
राजापूर, संगमेश्वर, रत्नागिरी, रायगड, गोवा अशा भागात आढळणारी ही वनस्पती आता दापोली तालुक्याच्या सड्यांवरही पुन्हा फुलू लागली आहे. दहा वर्षापूर्वी केलेल्या प्रत्यारोपणाचे आता सकारात्मक परिणाम दिसत आहेत. दीपकाडीला फुलं येऊ लागली आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 16/Jul/2025














