चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील रशुराम घाटातील कोसळलेली सरंक्षक भिंत व खचलेल्या काँक्रीटीकरणाच्या ठिकाणी तात्पुरती उपाययोजना म्हणून प्लास्टिक कापडाचे आच्छादन टाकण्यात आले आहे. येथील काम थांबले असून पावसाचा जोर कमी झाल्यानंतरच या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अजूनही या ठिकाणी काही भाग खचत असल्याने एकेरी मार्गावर वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. दरडीकडील बाजू वाहतुकीस बंद ठेवण्यात आली आहे.
कोकणातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या घाटाची एकूण लांबी ५.४० किलोमीटर आहे. चौपदरीकरणात चिपळूण आणि खेड अशा दोन टप्प्यांतील कंत्राटदार कंपन्यांमध्ये हा घाट विभागला गेला आहे. घाटातील काँक्रीटीकरण पूर्ण झाल्यानंतर संरक्षक भिंतीच्या कामावर लक्ष केंद्रित केले. मात्र, २०२२ मध्येच या काँक्रीटीकरणातील काही भाग खचला. परिणामी त्यावर उपाययोजना म्हणून सरंक्षक भिंत व गॅबियन वॉल उभारण्याचा निर्णय झाला; परंतु हे काम सुरू असताना अचानक संरक्षक भिंत कोसळली. पायथ्यालगत उभारलेल्या गॅबियन वॉलचा काही भागही महिनाभरापूर्वी पहिल्याच पावसात खचला. त्यानंतर आता तात्पुरत्या या ठिकाणचे काम पूर्णतः थांबवण्यात आले आहे.
पावसाळ्यानंतर गॅबियन वॉलच्या रचनेत काही किरकोळ बदल करून काम सुरू केले जाणार आहे. तसा प्रस्तावही तयार केला जात आहे. मात्र, आता पावसाचा जोर वाढल्याने या ठिकाणी उपाययोजना म्हणून कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या ठिकाणी प्लास्टिकचे आच्छादन टाकण्यात आले आहे. परशुराम घाटातील प्रवास अजूनही सुरक्षित झालेला नाही. दरडी रोखण्यासाठी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या असल्या तरी रस्त्याच्या खालील बाजूस अजूनही काँक्रीटीकरण खचण्याचे, तडे जाण्याचे प्रकार घडत आहे. तसेच काही ठिकाणी भरावाची मातीही थेट वस्तीत पावसाच्या पाण्यासोबत वाहून जात आहे. त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत लक्ष ठेवले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 16/Jul/2025














