रत्नागिरी : जिल्ह्यातील शासकीय आयटीआयमध्ये प्रथम फेरीत ६५ टक्के प्रवेश

रत्नागिरी : दहावीनंतर औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील एक ते दोन वर्षांचे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर रोजगार व व्यवसायाची संधी उपलब्ध होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेण्यासाठी ओढा अधिक आहे. इलेक्ट्रिशियन, मोटार मेकॅनिक, रेफ्रिजेशन व एअरकंडीशन, डिझेल मेकॅनिक, फिटर या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची विशेष पसंती आहे.

जिल्ह्यात १० शासकीय आयटीआय असून, २०७२ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रथम फेरीत १,२७४ जागांसाठी ८२५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, प्रवेशप्रक्रिया ६५ टक्के पूर्ण झाली आहे. तर खासगी आयटीआयमध्ये ८६० जागा आहेत. पहिल्या फेरीसाठी १५६ जागेवर प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली, त्यापैकी १२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. पहिल्या फेरीत ७७ टक्के
प्रवेश घेण्यात आले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे नऊ व रत्नागिरीत मुलींसाठी एक स्वतंत्र आयटीआय आहे. मुला-मुलींसाठी एक ते दोन वर्षाचे विविध अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नोकरी किंवा व्यवसायाची संधी उपलब्ध होत असल्यामुळे मुलांचा प्रवेशाकडे ओढा अधिक आहे.

मुलींनाही आयटीआय करायचंय
रत्नागिरी शहरात मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय असून, एकूण प्रवेशक्षमता १३६ आहे. प्रथम फेरीत ७८ मुलींनी प्रवेश घेतले आहेत.

आयटीआय’ला का
मिळतेय जास्त पसंती? – एक ते दोन वर्षांचे अभ्यासक्रम – अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नोकरी/व्यवसायाची संधी.

आयटीआय’ मध्ये मुलींसाठी हे खास कोर्स
इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर हार्डवेअर, ड्रेसमेकिंग, ब्युटी पार्लर, सुईंग टेक्नॉलॉजी असे पाच अभ्यासक्रम शिकविण्यात येत आहेत.

पहिल्या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश?
शासकीय आयटीआयमध्ये पहिल्या फेरीत ८२५ तर खासगी आयटीआयमध्ये १२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अद्याप चार प्रवेश फेरी शिल्लक आहेत.

९० टक्के गुण मिळवणाऱ्यांचाही अर्ज
आयटीआयमध्ये ५० टक्क्यांपासून ९० टक्के गुणवत्ता मिळविलेले विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. झटपट नोकरी, व्यवसायाच्या दृष्टीने अभ्यासक्रमासाठी आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यात येतात.

जिल्ह्यात एकूण दहा आयटीआय
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यासाठी एक याप्रमाणे नऊ व रत्नागिरीत मुलींसाठी स्वतंत्र एक मिळून एक शासकीय व खासगी सात आयटीआय आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 16/Jul/2025