लांजा : कचरा प्रकल्पासाठी योग्य जागेचा शोध सुरू असून, पंधरा दिवसांत योग्य जागा मिळाल्यानंतर प्रभाग १७ मधून घनकचरा प्रकल्प स्थलांतरित केला जाईल, असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी कुवे संघर्ष समितीला दिले आहे. यामुळे संघर्ष समितीची मागणी मान्य होणार आहे.
लांजा नगरपंचायतीच्या वतीने कुवे येथे टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि पाणी प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने याबाबत तातडीने दखल न घेतल्यास बुधवारपासून कचरा टाकण्यास मज्जाव करणार, तसेच कचऱ्याच्या गाड्यादेखील अडवल्या जातील, असा इशारा कुवे ग्रामस्थ व संघर्ष समितीने दिला होता. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी सायंकाळी कुवे संघर्ष समितीला पत्र दिले. घनकचरा प्रकल्पासाठी योग्य जागेचा शोध घेणे चालू आहे. योग्य ती जागा प्राप्त होतात आपल्या प्रभाग १७ मधून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थलांतरित केला जाईल. कचरा प्रकल्पाची जागा दुसऱ्या ठिकाणी बदलण्यासाठी नगरपंचायत सकारात्मक असून, जागेचा शोध घेणे सुरूच आहे. पुढील पंधरा दिवसांचा कालावधी लागणार असून त्यासाठी सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
प्रभाग १६ मधील रस्त्यावरील खड्डे भरण्याची कार्यवाही नगरपंचायतीकडून सुरू करण्यात येणार आहे. रस्त्यातील मोरीची साफसफाईकामी संबंधित विभागाकडे कर्मचारी यांना पाठवले होते. ही मोरी काही प्रमाणात साफ करण्यात आली. प्रत्यक्ष पाहणीत मोरी नादुरुस्त असल्याने बदलण्याची कार्यवाही गरजेची आहे. कामाची तांत्रिक पूर्तता पूर्ण केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पत्र मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिले आहे.
लांजा नगरपंचायतीचा घनकचरा हा कुवे येथील प्रभाग १७ येथील जमिनीत टाकला जात होता. यामुळे येथील ग्रामस्थांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत होते. यासाठी आम्ही सर्वपक्षीय एकत्र होत येथे कचरा टाकू नये म्हणून उठाव केला. येत्या पंधरा दिवसांत कचरा प्रकल्पासाठी योग्य जागा न मिळाल्यास कुवे येथील सर्व ग्रामस्थ नगरपंचायतीच्या आवारात कचरा आणून टाकतील- परवेश घारे, कुवे संघर्ष समिती
मुख्याधिकारी अनुपस्थित
लांजा नगरपंचायतीकडून लांजा शहर परिसरात साठणारा कचरा दोन-अडीच वर्षांपासून कुवे येथे टाकला जात आहे. कुवे संघर्ष समितीने हा कचरा येथे टाकण्यात येऊ नये, अशी वारंवार मागणी, अर्जाद्वारे विनंती करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 16/Jul/2025














