आठवडाभरात कृत्रिम फुलांवर बंदीचा निर्णय : मंत्री भरत गोगावले

मुंबई : राज्यातील कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून, त्यामुळे आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत असल्याच्या मुद्दा बुधवारी विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून, आठवडाभरात कृत्रिम फुलांवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती फलोत्पादनमंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत दिली.

आमदार महेश शिंदे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापरामुळे पारंपरिक नैसर्गिक फुलांची शेती धोक्यात आली आहे. तसेच, यामुळे तब्बल दोन हजार कोटींची फुलांची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आहे. त्याचा थेट फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन त्यावर बंदी घालण्याची मागणी शिंदे यांच्यासह आमदार कैलास पाटील, नाना पटोले, नारायण कुचे यांनी केली. त्यावेळी अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय करण्याचे आश्वासन मंत्री गोगावले यांनी दिले होते.

बुधवारी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आमदार महेश शिंदे यांनी कृत्रिम फुलांवरील बंदीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर, मंगळवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय करण्यात आला आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. कृत्रिम फुलांवर बंदी आणण्याचा निर्णय आठवडाभरात जाहीर केला जाईल, असे मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 17/Jul/2025