राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात आता ‘मिसिंग सेल’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यात बेपत्ता होण्याच्या घटनांना चाप लावण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात ‘मिसिंग सेल’ स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी ‘एडीजेएफ’ दर्जाच्या आयपीएस महिला पोलिस अधिकारी या सेलच्या प्रमुख असतील, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. हा सेल दर दोन महिन्यांनी बैठक घेऊन बेपत्ता प्रकरणांचा आढावा घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात बेपत्ता होण्याच्या घटना वाढत असल्या, तरी पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’ आणि ‘ऑपरेशन शोध’ मोहीममुळे लहान मुले-मुली, तसेच महिलांचा मोठ्या प्रमाणात शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. ‘ऑपरेशन मुस्कान’मध्ये जुलै २०१५ ते डिसेंबर २०२४ दरम्यान तब्बल ४१ हजार १९३ महिलांचा, तर ‘ऑपरेशन शोध’ मोहीम अंतर्गत ४,९६० महिला आणि १,३६४ बालकांचा शोध लागला, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. पोलिसांनी हा चांगला उपक्रम सुरू केला असून, तो यापुढेही सुरूच ठेवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यात महिला व मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याबद्दल शिवसेना ‘उबाठा’ आमदार सुनील शिंदे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भाजपच्या चित्रा वाघ, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी भाग घेतला.

मानवी तस्करीविरोधात ठोस उपाययोजना
भारतातच नव्हे, तर जगातला सर्वात मोठा व्यवसाय हा मानवी तस्करीचा असून, त्या खालोखाल ड्रग्जचा व्यवसाय आहे. सरकारने यासंदर्भात ठोस उपाययोजना सुरू केल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ‘भरोसा’ हे वन स्टॉप केंद्र महिलांना समुपदेशन, संरक्षण व कायदेशीर मदत पुरवते. घरगुती हिंसाचार, कौटुंबिक वाद, यामुळे घर सोडलेल्या महिलांना या केंद्राचा उपयोग होतो. शालेयस्तरावर ‘पोलिस काका-दीदी’ उपक्रमांतर्गत लैंगिक शिक्षण, चांगला-वाईट स्पर्श यावर जनजागृती केली जाते. आता यामध्ये ‘मिसिंग पर्सन’बाबतची माहितीही समाविष्ट केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 17/Jul/2025