गणपतीपुळे सरपंच कल्पना पकये यांना ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार प्रदान!

रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे गावच्या सरपंच कल्पना पकये यांना नुकताच पुण्यातील नालंदा ऑर्गनायझेशनतर्फे दिला जाणारा आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला आहे.

पकये यांनी कोविड काळात गावात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी संपूर्ण गावात सॅनिटायझिंग केले आणि कोविड लसीकरणावेळी एक विशेष ग्रामकृती दल स्थापन करून मोलाची मदत केली. याव्यतिरिक्त, त्यांनी गावात विविध विकास कामे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत.

गावातील महिलांच्या सक्षमीकरणासाठीही पकये यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण आणि महिलांसाठी आरोग्य शिबिरे यांसारखे अनेक उपक्रम राबवले आहेत.

पुणे येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्याला निवृत्त कृषी सहसंचालक श्रीपाद खळीकर, अभिनेते विनोद वणवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या कार्यामुळे गणपतीपुळे गावाचे नाव उज्वल झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:32 21-07-2025