दापोली : आदिवासी भागात कायदेविषयक जनजागृती

दापोली : तालुक्यातील कुडावळे आदिवासीवाडी येथे आंतरराष्ट्रीय न्याय दिन साजरा करण्यात आला. हा उपक्रम दापोली तालुका विधी सेवा समितीतर्फे आयोजित करण्यात आला होता. ग्रामीण व विशेषतः आदिवासी भागातील ग्रामस्थांमध्ये कायद्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास दापोली दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आर. ए. नेमाडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विधि सेवा समितीच्या कार्यप्रणाली व न्यायसहाय्य मिळविण्याच्या विविध उपायांवर माहिती दिली.

कार्यक्रमात अॅड. मनीषा जोशी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या राष्ट्रीय अभियानाबाबत माहिती दिली. दापोली पोलिस स्थानकाच्या महिला अधिकारी पूजा हिरेमठ यांनी बालसंरक्षण कायदा व बालविवाह प्रतिबंधक कायदा यांचे महत्त्व सांगून पालकांनी कायदेशीर जबाबदाऱ्या समजून घ्याव्यात, असे आवाहन केले. सहायक गटविकास अधिकारी डी. एस. मर्चडे यांनी आदिवासी नागरिकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.

यावेळी न्यायालयातील अधिकारी अदिती भिडे, सरपंच प्रमोद कदम, माजी पंचायत समिती सदस्य मालती पवार, पोलिस पाटील प्रांजली कुरवाडकर, विधि सेवा समितीचे सदस्य मनोज पवार, माजी सरपंच महेश कदम, तसेच वाडी अध्यक्ष वामन पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:16 PM 21/Jul/2025