रत्नागिरी : केंद्र आणि राज्य पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत रत्नागिरी नगरपरिषद संचलित आधार नागरी बेघर निवारा केंद्राचे आज मोठ्या उत्साहात लोकार्पण झाले. यावेळी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी या केंद्राचे नामकरण ‘स्नेहमंदिर’ असे करण्याचे भावनिक आवाहन केले. रत्नागिरी जिल्हा संस्कारक्षम जिल्हा असून, भविष्यात अशी बेघर निवारा केंद्रे उभी राहूच नयेत, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या भावनिक सोहळ्याला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. “बेघरांसाठी निवारा केंद्र असं मी म्हणणार नाही, तर याला ‘स्नेहमंदिर’ म्हणू,” असे डॉ. सामंत म्हणाले. शासनामार्फत उत्तम दर्जाचे घर उपलब्ध करून देण्याचा हा जिल्ह्यातील उपक्रम महाराष्ट्रात एक आदर्श ठरेल, असेही ते म्हणाले. “आम्ही ज्या गादीवर झोपतो, जी चादर वापरतो, तशीच सोय इथल्या नागरिकांना मिळाली पाहिजे. करमणुकीसाठी स्वतंत्र टीव्ही आणि वातानुकुलित घरात त्यांनी राहिले पाहिजे,” असे सांगत, त्यासाठी लागणारा खर्च देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.
वृद्धांना सन्मान द्या, ‘स्नेहमंदिर’ला भेट द्या!
डॉ. सामंत यांनी वृद्धांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. “ज्या मुलांना जन्म दिला, ती मुले ‘हे घर तुमच्यासाठी खुले नाही’ असे आपल्या ज्येष्ठांना सांगतात, हे अत्यंत वाईट आहे. हे मला इथं आल्यानंतर कळलं आणि म्हणून मला असं वाटतं की याचे स्नेहमंदिर असा नामकरण सोहळा देखील झाला पाहिजे,” असे ते म्हणाले. या केंद्रात येणाऱ्या ज्येष्ठांना आपल्या मुलामुलींपेक्षाही जास्त आपुलकी नगरपालिकेकडून मिळाली, असे वाटले पाहिजे, अशा सुविधा येथे असाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“घरातल्या माणसासारखं तुम्ही जर या लोकांना वागवाल, त्यावेळी त्यांचा शेवट हा आनंदामध्ये असू शकतो,” असे ते म्हणाले. तसेच, महाराष्ट्रात उभारल्या जाणाऱ्या 87 निवारा केंद्रांचे नामकरणही ‘स्नेहमंदिर’ असे करावे, अशी मागणी आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांनी ब्रँड ॲम्बेसिडर बनावे!
पालकमंत्र्यांनी महिलांना विशेष आवाहन केले. “महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मातृत्व जपतात, त्यांनी अशा केंद्राच्या ब्रँड ॲम्बेसिडर बनावं. उद्घाटनाला जशी आपण इमारत ठेवलेली आहे, तशीच 365 दिवस ती इमारत राहिली पाहिजे,” असे ते म्हणाले. रत्नागिरीची संस्कृती जपण्याचे काम महिलांनी करावे आणि आपल्या परिसरातील ज्येष्ठांची विचारपूस करण्यासाठी ‘स्नेहमंदिर’ला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी मुख्याधिकारी वैभव गारवे, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, बिपीन बंदरकर, राजेंद्र शेटे, सुदेश मयेकर, राजेंद्र महाडिक, बाबू म्हाप शीतलताई बावस्कर, शिल्पाताई सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. लोकार्पणानंतर पालकमंत्र्यांनी केंद्राची पाहणी करून ज्येष्ठांशी संवाद साधला.














