रत्नागिरीत उदय सामंत प्रतिष्ठानची ‘मंगळागौर’ यंदा अधिक दिमाखात, सामाजिक संदेश आणि आरोग्य तपासणीचे विशेष आकर्षण!

रत्नागिरी : महिलांना पारंपरिक खेळांचे व्यासपीठ मिळवून देणारी आणि सामाजिक सलोखा वाढवणारी उदय सामंत प्रतिष्ठान आयोजित मंगळागौर स्पर्धा यंदा तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. गेली दोन वर्षे रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातून सुमारे २७५ ते २८० महिला संघांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, यंदाही ही स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी केली जाणार आहे.

उदय सामंत यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही मंगळागौर स्पर्धा दरवर्षी श्रावण महिन्यात आयोजित केली जाते. या स्पर्धेमुळे महिलांना एकत्र येण्याची संधी मिळते, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते आणि पारंपरिक खेळ नवीन पिढीला शिकायला मिळतात, ज्यामुळे सामाजिक संबंध अधिक दृढ होतात. यंदाच्या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर होताच ग्रामीण भागातील महिला संघांनी नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे.

सामाजिक संदेश आणि आरोग्य तपासणीचे अनोखे आयोजन

यंदाच्या मंगळागौर स्पर्धेच्या आयोजनात सामाजिक संदेश देण्याचा विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या ठिकाणी पोलीस विभागामार्फत मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम, सायबर गुन्हे कसे टाळावेत, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, महिलांची सुरक्षितता यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले जाईल.

यासोबतच, उदय सामंत प्रतिष्ठान गेली अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे, महिलांच्या सुरक्षित आरोग्यासाठी या स्पर्धेत एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रत्येक महिलेचा रक्तगट आणि हिमोग्लोबिन तपासले जाणार असून, त्याचे कार्ड प्रत्येक महिलेला देण्यात येणार आहे. यामुळे महिलांना स्वतःच्या आरोग्याबद्दल माहिती मिळेल आणि आरोग्य सुरक्षेचा संदेशही दिला जाईल.

महाअंतिम फेरीने स्पर्धेची रंगत वाढणार!

यंदाची मंगळागौर स्पर्धा अधिक वेगळी आणि अटीतटीची असणार आहे. प्रत्येक ग्रामीण भागातील जिल्हा परिषद गटातून आणि शहरातून विजयी होणाऱ्या पहिल्या संघाला महाअंतिम स्पर्धेत प्रवेश मिळणार आहे. ही महाअंतिम फेरी रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी रत्नागिरी येथील सावरकर नाट्यगृहात मोठ्या दिमाखात साजरी करण्यात येईल.

महिलांनी महिलांसाठी तयार केलेले हे व्यासपीठ आणि त्यातील पारंपरिक खेळांचे सादरीकरण पाहण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उदय सामंत प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. यंदाची स्पर्धा महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच, सामाजिक आणि आरोग्यविषयक जागृतीचा एक प्रभावी मंच ठरणार आहे.