रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद औद्योगिक वसाहती (MIDC) चा वाद आता शिगेला पोहोचला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने दंड थोपटले असून, यामुळे जिल्ह्यात ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ असा नवा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाटद MIDC विरोधात ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. याचाच भाग म्हणून भव्य मोर्चा काढण्यात आला होता, ज्यामध्ये मानवाधिकार कार्यकर्ते ॲड. असीम सरोदे यांनी उपस्थित राहून उद्योगमंत्री सामंत यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता या आंदोलनात शिवसेना (ठाकरे गट) उतरल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
आज रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन या मोर्च्यावर आणि त्यांच्यावरील आरोपांवर तीव्र प्रतिक्रिया दिली.
पालकमंत्री सामंत यांचा ठाकरे गटावर पलटवार
पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी परवाच्या मोर्च्यावर थेट भाष्य करणे टाळले, मात्र पुढील आठ दिवसांत यावर सविस्तर बोलणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “वाटदमध्ये एमआयडीसी व्हावी यासाठी किती शेतकरी प्रयत्नशील आहेत, याची प्रचिती तुम्हाला येईल. या ठिकाणी काही लोकांचा स्वतःचा इंटरेस्ट (स्वार्थ) आहे.”
ॲड. असीम सरोदे यांना कोणीतरी ‘मिसब्रिफिंग’ (चुकीची माहिती) दिली असल्याचे सांगत, सामंत यांनी प्रांताधिकाऱ्यांना सरोदे यांच्यासमोर खरी वस्तुस्थिती मांडण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. “जे मोर्च्यात होते, त्यांची प्रपोजल काय होती, ती अजून शेतकऱ्यांनी सांगितली नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.
‘MIDC हवी असणाऱ्या शेतकऱ्यांची सभा शनिवारी’
सामंत यांनी आपण राजकीय आचारसंहिता पाळत असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, “एमआयडीसीला विरोध करणाऱ्या बाहेरच्या लोकांचा तिथे मोर्चा काढण्यात आला आणि सभा झाली. पण ज्यांना एमआयडीसी पाहिजे, त्यांची सभा शनिवारी होत आहे आणि मी तिथे हजर राहणार आहे.” यामुळे ५,००० मुलांना रोजगार मिळेल, अशी त्यांची भूमिका असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
आज सकाळीच वाटदमधील ७-८ सरपंच आणि काही शेतकऱ्यांनी आपल्याला भेटून एमआयडीसी व्हावी अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. किती लोकांनी जमिनी दिल्या आहेत, ते मी लवकरच जाहीर करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. ॲड. असीम सरोदे जे बोलले की शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रकल्प झाले पाहिजेत, तीच भूमिका उद्योग विभागाची राहील आणि ज्यांनी मला पाच वेळा निवडून दिले, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, ही आमची भूमिका राहील, असे सामंत यांनी ठामपणे सांगितले.
बारसू-नाणारवासीयांचे स्वागत आणि कोकणातील मोठ्या प्रकल्पांचे स्वप्न
मोर्चाचे नियोजन करणाऱ्यांवरच पैसे घेतल्याचे आरोप असल्याचा गौप्यस्फोटही सामंत यांनी केला. बारसू आणि नाणारवासीयांचे स्वागत करताना, सामंत म्हणाले की, ते रिफायनरी सोडून कोणत्याही प्रकल्पाचे स्वागत करणार आहेत.
आपले मोठे बंधू किरण सामंत हे राजापूरचे आमदार असल्याने, राजापूरला चांगला प्रकल्प देता येणार असेल तर तो देऊ, असेही त्यांनी सांगितले. सामंत यांनी कोकणामध्ये टेस्लासारखा मोठा प्रकल्प मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यावा, अशी आपली इच्छा व्यक्त केली. आपल्या मतदारसंघात ३०,००० कोटींचे प्रकल्प येत असून, त्यातून १० ते १२ हजार मुलांना रोजगार मिळेल, अशी माहितीही त्यांनी दिली.














