रत्नागिरी : जिद्द, चिकाटी आणि मेहनत कायम ठेवा, ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी लक्ष केंद्रित करा. राज्यात कोकण बोर्ड अव्वल आहे. मात्र या जिल्ह्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत मागे का? असा सवाल करीत भविष्यात आपल्या जिल्ह्यातील युवकांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. त्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस यांनी केले.
लांजा तालुका मुख्याध्यापक संघ तसेच तालुका गणित अध्यापक मंडळ, विज्ञान अध्यापक मंडळ व लांजा राजापूर तालुका नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीमध्ये प्रथम आलेल्या तसेच विज्ञान व गणित विषयात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभशनिवारी लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
जिल्हा प्रमुख (उध्दव बाळासाहेब ठाकरे) दत्ता कदम यांनी हा कार्यक्रम तालुक्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहून विविध शैक्षणिक उपक्रम राबवायला हवेत असे सांगितले. जीवनात यशस्वी नक्की व्हा, मात्र आदर्श नागरिक म्हणून समाजासमोर आदर्श ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी लांजा तालुक्यातील सुमारे ७५ गुणवंत विद्यार्थ्यांचा आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त विज्ञान शिक्षक प्रभाकर सनगरे, माने यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, लांजा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संदेश कांबळे, कोलते कॉम्प्युटरचे संतोष कोलते, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, लांजा हायस्कूलचे उपमुख्याध्यापक आजगावकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक गणपत शिर्के, तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव महंमद सय्यद, गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र साळवी, सचिव महादेव माळी, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप लाड, तर आभार प्रदर्शन सर्जेराव पाटील यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:41 PM 22/Jul/2025













