दापोली : कोळंबे गावात सुधारित कृषी तंत्रज्ञानावर प्रात्यक्षिक

पावस : दापोली डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठांतर्गत दापोली कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव अंतर्गत कोळंबे गावात कार्यरत मृदासुत गटाने भात पिकात शाश्वत उत्पादनासाठी विविध सुधारित तंत्रज्ञानांची प्रभावी प्रात्यक्षिके गावातल्या बागवडीतील प्रगतशील शेतकरी नारायण आगाशे यांच्या शेतावर आयोजित केली होती.

या प्रात्यक्षिकांमध्ये गिरीपुष्पाच्या पानांचा हिरवळ खत वापर प्रात्यक्षिक, भात पिकासाठी जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी गिरिपुष्पाच्या झाडांची पाने प्रतिहेक्टर ५ टन याप्रमाणात जमिनीत मिसळण्यात आली. यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढून मृदासुधारणेस मदत होते. फॉस्फरस विद्रावक जीवाणूचा वापर करून भात रोपांची प्रक्रिया करण्यात आली. यामुळे स्फुरद उपलब्धतेत वाढ होते व भात रोपांची मुळेही अधिक मजबूत होतात.

कोकण कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार २० सेंमी, १५ सेंमी या अंतरावर भात रोपांची सरळ रेषेत दोरीचा वापर करून लागवड करण्यात आली. या नियोजनबद्ध लागवडीमुळे रोपांमधील स्पर्धा कमी होऊन, पोषकद्रव्ये, सूर्यप्रकाश व हवेशीरपणा योग्य प्रमाणात मिळून भात उत्पादनात वाढ होते. ह्या पद्धतीने लावणी केल्यास आंतरमशागत करणेही सोपे होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 24/Jul/2025