आजपासून श्रावणमास सुरू!

रत्नागिरी : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा महिना व्रतवैकल्यासह पूजाविधीसाठी पवित्र व शुभ मानला जातो. शिवमंदिरात नामसप्ताह, एक्का या धार्मिक नामगजर सोहळ्याचे आयोजन केले जाते. शहरी व ग्रामीण भागातील मंदिरात वाडीवस्तीमधील ग्रामस्थ नामसप्ताहात सामील होतात. मंदिरात दर्शानासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात.

श्रावण महिन्यात भाविक दर सोमवारी उपवास करतात शिवाय देवाला शिवमुखही अर्पण करतात. येत्या शुक्रवारी (ता. २५) पासून श्रावणमास सुरू होत आहे. काही मंदिरात श्रावणाच्या पहिल्याच दिवशी नामसप्ताहाला सुरुवात होते. सलग सात दिवस मंदिरात नामगजर असतो तर काही मंदिरात मात्र एक्का (एक दिवसाचा नामगजर) सुरू असतो. लग्नानंतर श्रावण महिन्यात पहिली पाच वर्षे मंगळागौरीचे पूजन केले जाते शिवाय या महिन्यात विविध सणांचीही रेलचेल असते. त्यामुळे धार्मिकदृष्ट्या या महिन्याला विशेष महत्त्व आहे. श्रावणानंतर सुरू होणाऱ्या भाद्रपदातील गणेशोत्सवाची प्रत्येक भाविकाला उत्सुकता असल्याने श्रावणाचे स्वागत उत्साहात तर होते तसेच संपूर्ण महिनाभर शाकाहार अवलंबून धार्मिक व्रतवैकल्ये पूर्ण करून सात्त्विक आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.

श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपवास केला जातो तसेच शंकराला शिवमूठ अर्पण केली जाते. त्यामुळे तांदूळ, तीळ, मूग, जव हे धान्य अर्पण केले जाते. पहिला सोमवार २८ जुलैला तांदूळ अर्पण, दुसरा सोमवार ४ ऑगस्टला तीळ, तिसरा सोमवार ११ ऑगस्टला मूग तर चौथा सोमवार १८ ऑगस्टला जवस हे धान्य अर्पण करण्यात येणार आहे.

या महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा, गोकुळाष्टमीसारखे सण येतात. श्रावणमास सुरू होण्यास दोन दिवस शिल्लक असून, या दिवसात पूजेसाठी लागणारी पाने, फुले, फळे बाजारात विक्रीसाठी आली आहेत. शहरातील काशीविश्वेश्वर, राजापूर तालुक्यातील धूतपापेश्वर, देवरुखातील मार्लेश्वर, गुहागरातील व्याडेश्वर यांसह जिल्ह्यातील लहान- मोठी मंदिरे गजबजणार आहेत. या महिन्यातील सोमवारी उपवास करणारे आवर्जून श्री शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी जात असतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 25-07-2025