मच्छीमारांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध : मिरकरवाडा बंदराच्या भूमिपूजनात मंत्र्यांचे प्रतिपादन

रत्नागिरी: “मच्छीमार बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि कोकण किनारपट्टीचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आम्ही अतिक्रमणासारख्या कठोर निर्णयांचीही भीती बाळगली नाही. आता या बंदराच्या आणि पर्यायाने इथल्या मच्छीमारांच्या विकासासाठी चांगल्या दर्जाची कामे केली जातील,” असा विश्वास मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. तर, मिरकरवाडा बंदर विकासासाठी आणखी ३६ कोटींचा प्रस्ताव तयार असल्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्याच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मत्स्य विकास आयुक्त किशोर तावडे, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, माजी जि.प. सदस्य बाबू म्हाप आदी उपस्थित होते.
अतिक्रमण हटवून विकासाचा मार्ग मोकळा
बंदरेमंत्री श्री. राणे म्हणाले, “आम्ही कोकण किनारपट्टीच्या सशक्तीकरणाच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली. त्यामध्ये मिरकरवाडा बंदराचा विकास आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा होता. मात्र, इथे अतिक्रमणाच्या अडचणी समोर आल्या. काहींनी आमच्याबद्दल तीव्र गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. पण, आम्ही ठाम राहिलो आणि त्यामुळेच आजचा दिवस उजाडला आहे.” प्रत्येक नागरिकाचे भविष्य घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात बंदराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी साठवण क्षमता, बर्फ कारखाने, सांडपाणी व्यवस्था, मासेमारीची यंत्रणा आणि इतर सोयी-सुविधा यांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अतिक्रमण हटवताना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी केलेल्या सहकार्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. त्यांचे या विकास प्रक्रियेकडे लक्ष असून लवकरच तिसऱ्या टप्प्यातील विकासासाठी सज्ज राहणार असल्याचे ते म्हणाले. “आजचा हा विकासदृष्टीकोन मच्छीमार समाजाच्या भविष्यासाठी महत्त्वाचा आहे,” असेही त्यांनी सांगितले.
३६ कोटींच्या आराखड्यामुळे मच्छीमारांना समृद्धीची नवी दिशा
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, “मिरकरवाड्याचा विकास व्हावा, यासाठी गेली वीस वर्षे झगडतोय. पण, तो होण्यासाठी कोकणच्या सुपुत्रालाच मंत्री व्हावे लागले.” या बंदराच्या विकासासाठी २२ कोटींचा पहिला टप्पा सुरू झाला असून, ३६ कोटींचा आराखडा विभागाने तयार केला आहे. यातूनच इथल्या मच्छीमारांना समृद्धीची नवी दिशा मिळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंत्री श्री. राणे यांनी या बंदर विकासाचा संकल्प केला आणि त्यांच्यामुळेच आज मच्छीला कृषीचा दर्जा मिळाल्याचे सामंत यांनी सांगितले. त्यामुळे मिरकरवाडा भविष्यात राज्यातील सर्वाधिक उत्पन्न देणारे बंदर ठरेल, याचा मला विश्वास आहे आणि त्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही ते म्हणाले. अशावेळी अवैध मासेमारीला आळा घालतानाच आमचा छोटा मच्छीमारही मोठ्या मच्छीमारासारखाच जगला पाहिजे, हीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “कोकणचा सुपुत्र मत्स्य व्यवसायासाठी जीव ओतून काम करतो, हे कोकणासाठी भाग्य आहे. नाटे आणि हरणे बंदरासाठी २०० कोटींचा निधी मंजूर झाला असून, भविष्यात मिरकरवाडा मलपीपेक्षा मोठे बंदर होईल यात दुमत नाही. त्यामुळेच माझ्या मतदारसंघात होणाऱ्या मत्स्य विकासासाठी, मच्छीमारांचे भवितव्य घडवण्यासाठी माझे नेहमीच सहकार्य असेल,” असे त्यांनी सांगितले.