सलमान खानला Y+ दर्जाची सुरक्षा

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान याला बिश्नोई गँगची धमकी मिळाल्याने त्याच्या सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सलमान खानचे जवळचे मित्र आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

सलमान खानला वाय-प्लस सुरक्षा

सलमान खानला आधीच वाय-प्लस सुरक्षा देण्यात आली होती, आता त्यात आणखी एक दर्जा वाढवण्यात आला आहे. आता सलमान कुठेही पोहोचण्याआधी पोलिस त्या भागात शोध घेतील आणि नाकाबंदी करण्यात येईल. सलमान खानला पुरवण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा नेमकी काय असते आणि सरकारला यासाठी किती खर्च करावा लागणार आहे, यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.

वाय प्लस दर्जाची सुरक्षा म्हणजे काय?

सलमान खानला मिळालेल्या वाय प्लस दर्जाच्या सुरक्षा बंदोबस्तात 25 सुरक्षा रक्षक त्याच्यासाठी तैनात असणार आहेत. यामध्ये दोन किंवा चार NSG कमांडोसह काही पोलिस अधिकारी असे एकूण 25 सुरक्षा रक्षक असणार आहे. हे सुरक्षा अधिकारी दोन शिफ्टमध्ये काम करतात. यासोबत त्यांच्याकडे बुलेट प्रूफ गाडी देखील असते. वाय प्लस सुरक्षेमध्ये एकूण किती सुरक्षा रक्षक, पोलिस आणि कमांडो असतात, याची अधिकृत माहिती सुरक्षेच्या कारणास्तव देता येत नाही.

सलमानच्या वाय प्लस सुरक्षेसाठी किती खर्च?

गेल्या काही दिवसांपूर्वी सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. तेव्हापासून मुंबई पोलिस सलमानच्या घराबाहेर तैनात आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमान खानच्या वाय प्लस सुरक्षेसाठी सरकारला दर महिन्याला सुमारे 12 लाख रुपये खर्च येऊ शकतो. त्यामुळे वर्षाला हा खर्च साधारणपणे दीड कोटींपर्यंत जाऊ शकतो. याशिवाय त्याचे पर्सनल बॉडीगार्ड, सिक्युरिटी यांचा एकूण आकडा पाहता सलमान खानच्या वाय प्लस सुरक्षेसाठी सरकारला 3 कोटी वार्षिक खर्च येऊ शकतो.

सलमान खानच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष

नवी मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बिश्नोई गँगने सलमान खानच्या हत्येसाठी 25 लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यासोबत मुंबई, पननेल आणि गोरेगाव भागात त्याच्या प्रत्येक हाचचालींवर लक्ष ठेवण्याचं काम 60 ते 70 जणांना देण्यात आलं होतं, असंही सुत्रांकडून समोर आलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:22 17-10-2024