रत्नागिरी : ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील रस्ते टिकावू होण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते यापुढे सिमेंट कॉक्रीटचे करण्यात येणार आहेत. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, संगमेशवर आणि रत्नागिरी या पाच तालुक्यांतील १२०.५४ किलोमिटर लांबीच्या ३९ रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी १९० कोटीला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
ग्रामीण भागात रस्त्यांचे डांबरीकरण झाल्यानंतर काही महिन्यांतच त्यांची अवस्था अत्यंत वाईट होते. त्यामुळे त्या रस्त्यावरून ये-जा करण्यात तेथील ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्ता कमी आणि खड्डे अधिक, अशी स्थिती अनेक रस्त्यांची असल्याचे पाहावयास मिळते. ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने केंद्राच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू केली आहे. या योजनेतून पूर्वी रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत होते. ते आता सिमेंट कॉक्रीटचे होणार आहेत.
सध्या जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागात रस्त्यांचे डांबरीकरण झालेल्या रस्त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीऐवजी सिमेंटीकरण केल्यानंतर रस्ते सोयीचे ठरणार आहेत. सिमेंटच्या रस्त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा प्रवास सुकर होणार आहे. प्रधानमंत्री ग्रासडक योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील न जोडलेल्या व किमान एक हजार लोकसंख्या असलेल्या वाड्या-वस्त्यांना जोडण्यासाठी व ग्रामीण भागातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दर्जेनती करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ ही योजना राबविण्यात येणार आहे
रस्त्यांची कामे लवकरच
पाच तालुक्यातील १२०,५४ किलोमीटर लांबीच्या ३९ रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी शासनाने १९० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. ही कामे लवकरच सुरू होणार असून हे रस्ते सिमेंटचे बनविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पूर्वीची १२० कामे सुरू आहेत. त्यामध्ये ११८ रस्ते आणि २ पुल आहेत. या रस्त्यांची लांबी २९१ किलोमीटर असून त्यावर २५४. ४१ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:45 PM 30/Jul/2025














