मंडणगड : श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारचे औचित्य साधून तुळशी न्यू इंग्लिश स्कूल या माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तुळशी गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवले. या परिसरातील विरगळ सतीशिळांचीही स्वच्छता केली.
श्रावण महिन्याचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेऊन प्रशालेने राबवलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले आहे. तुळशी गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर आणि तेथील परिसर अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. वर्षभर अनेक तिथींना देवळात पूजाअर्चा, भजन आणि पूजन कार्यक्रम होत असतात. गावाच्या माथ्यावर वसलेले मंदिर लक्ष वेधून घेते. मंदिर परिसरात आढळून येणाऱ्या वीरगळ, सतीशिळा या गावाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या आहेत. त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने मंदिर परिसरातील जुन्या वीरगळची विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षकांनी माहिती दिली. श्रावण महिन्याचे आध्यात्मिक महत्त्व विषद करताना नैसर्गिक घडामोडी सांगून निसर्गात होत जाणारे बदल वैज्ञानिक दृष्टिकोन यावर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी या वेळी श्रमदान करून मंदिर परिसर स्वच्छ केला. या अभियानात प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा नटे, शिक्षक शिवाजी सोनवणे, टी. एस. खंदारे, सुरेश कोतवाल, कैलास धाडवे, कर्मचारी संदेश पारधी यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 30/Jul/2025














