रत्नागिरी, (४ ऑगस्ट) – मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी ८ वाजता गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले होते, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, रुग्णवाहिका येताच ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले आणि सकाळी १० वाजून १० मिनिटांनी महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत झाली आहे. ग्रामस्थांची जी काही नुकसानभरपाई असेल ती देण्यास ठेकेदाराने तयारी दर्शवली आहे. आज दुपारी या प्रश्नाबाबत एक महत्वाची बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात होणार असल्याची माहिती मिळत आहे.
हातखंबा गावाजवळ झालेल्या या अपघातात टँकर अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टपरीला आणि काही दुचाकींना धडकला होता. या धडकेत दुचाकींचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, चार दिवसांपूर्वीच याच भागात झालेल्या अपघातामुळे संतप्त झालेले ग्रामस्थ पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणारे टँकर वारंवार अपघातग्रस्त होत असल्याने आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांचे म्हणणे होते.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि शिवसेना नेते बाबू म्हाप हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्याचबरोबर मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदाराचे प्रतिनिधीही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली. रुग्णवाहिका येताच मानवतावादी दृष्टिकोन बाळगून ग्रामस्थांनी रास्ता रोको मागे घेतला. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. यामुळे गेल्या दोन तासांपासून महामार्गाच्या दोन्ही बाजूला अडकलेल्या वाहनांना पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला.













