नगरपालिकेच्या कर्मचारी कपातीमुळे शिवसेना आक्रमक; सणांच्या तोंडावर जनतेची गैरसोय टाळण्याची मागणी

रत्नागिरी: शहरातील नगरपालिकेकडे असलेल्या सफाई आणि इतर ५५ कर्मचाऱ्यांची कपात झाल्याची बातमी समजताच शिवसेना आक्रमक झाली आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सवासारख्या सणांच्या तोंडावर ही कर्मचारी कपात झाल्यामुळे शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या असून, शिवसेनेने यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

कर्मचारी कपातीमुळे वाढलेल्या समस्या

कर्मचारी कपातीमुळे कचरा गाड्या शहरात उशिराने पोहोचत आहेत, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. तसेच, अतिवृष्टीमुळे शहरात ठिकठिकाणी खड्डे पडले असून, ते तात्काळ बुजवण्याची आवश्यकता आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने यावरही लक्ष वेधले.

वीजपुरवठा खंडित होण्याचा मुद्दा

यासोबतच, शिवसेनेने शिळ धरणावरील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचा मुद्दाही उचलून धरला. एमएसईबीच्या हलगर्जीपणामुळे एक्सप्रेस फिडरवरील वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. ही बाब लक्षात घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, जेणेकरून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, अशी मागणी शिवसेनेने केली.

मुख्याधिकाऱ्यांची भेट

शिवसेनेच्या या भूमिकेवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, उपजिल्हाप्रमुख राजन शेटे आणि महिला शहर संघटक स्मितलताई पावसकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. निमेश नायर, दीपक पवार, संजय हळदणकर, बंटी कीर, राकेश नागवेकर, अभिजीत दुडे, सौरभ मुलुष्टे, मनोज साळवी, मनीषा बामणे, हेमंत जाधव यांच्यासह अन्य शिवसैनिकही यावेळी उपस्थित होते.

या सर्व गंभीर मुद्द्यांवर लवकरात लवकर उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.