रत्नागिरी : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी, तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी नाट्य संस्थांकडून ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी दिली.
२२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी डिसेंबर २०२५ पासून विविध १० केंद्रावर, तर ६४ व्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी प्रत्येक एका केंद्रावर डिसेंबर २०२५ पासून आयोजित करण्यात येणार आहे. नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या http// mahanatyaspardha.com या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने द्यावी.
स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अमानत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. राज्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 07/Aug/2025














