रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या यूथ फेस्टिव्हलमध्ये रत्नागिरीचा सुपुत्र कुमार हर्ष सुरेंद्र नागवेकर याला भाऊसाहेब वर्तक सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यापीठाच्या यूथ फेस्टिव्हलचा वार्षिक बक्षीस समारंभ चर्चगेटच्या ओरिएंटेशन हॉलमध्ये पार पडला. या कार्यक्रमात सत्तावन्नाव्या यूथ फेस्टिव्हलची विशेष बक्षिसे आणि राष्ट्रीय, राज्य, विभाग पातळीवर विद्यापीठाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
समारंभात चिल्ड्रन्स वेल्फेअर सेंटर लॉ कॉलेजचा विद्यार्थी आणि रत्नागिरीचा सुपुत्र कुमार हर्ष नागवेकर याला विद्यापीठाचा भाऊसाहेब वर्तक सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार देण्यात आला. विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट वक्त्यासाठीचा फिरता चषक व कायमस्वरूपी सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
हर्ष नागवेकर या महोत्सवात वक्तृत्व विभागात सुवर्णपदक विजेता ठरला होता. त्याच्या बक्षीस वितरण समारंभात अभिनेते श्रेयस तळपदे हे विशेष अतिथी म्हणून , तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 07-08-2025














