अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयिताला रत्नागिरीत अटक

रत्नागिरी : ७ ऑगस्ट २०२५ च्या रात्री ११.४५ वाजता रत्नागिरी शहरातील एका फर्निचर दुकानाच्या आडोशाला संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा व्यक्ती चोरी किंवा इतर कोणत्याही गंभीर गुन्ह्याच्या उद्देशाने अंधाराचा फायदा घेऊन लपून बसला होता असा पोलिसांना संशय आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार अमित पालवे गस्तीवर असताना त्यांनी जहीर मुजावर यांच्या फर्निचर दुकानाच्या बाजूला एका व्यक्तीला संशयास्पद स्थितीत पाहिले. त्या व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने पोलिसांना समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चोरीसाठी वापरली जाणारी हत्यारे आढळून आली.

यामध्ये एक हिरवी मूठ असलेला ८ इंच लांब स्क्रू ड्रायव्हर (अंदाजे किंमत २५ रुपये) आणि एक पिवळ्या-काळ्या रंगाचा हेक्सा ब्लेड (अंदाजे किंमत २० रुपये) असे साहित्य मिळाले. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची ओळख पटली असून तो मूळचा नेपाळ येथील रहिवासी आहे. या प्रकरणी त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 09-08-2025