गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याचे ‘रनप’चे नियोजन

रत्नागिरी : पावसाने उसंत घेतल्याने रत्नागिरी शहरातील खड्डे बुजवण्याचे काम रत्नागिरी नगर परिषदेतर्फे जोरात सुरू झाले आहे. पावसाळी डांबराने खड्डे भरले जात आहेत. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी खड्डे भरले जावेत, असे नियोजन करण्यात आले आहे. मात्र हे भरलेले खड्डे किती दिवस टिकणार याबाबत नागरिकांमधून प्रश्न उपस्थित होत आहे.

रत्नागिरी शहरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण प्रस्तावित आहे. पावसाळा असल्याने या रस्त्यांच्या कामांना सुरूवात होवू शकलेली नाही. त्यामुळे आधीच खराब झालेले रस्ते खड्डेमय झालेत. राजकीय पक्षांकडून खड्डे भरण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेवर दबाव टाकण्यात येत आहे. आता पावसाने उसंत घेतल्याने खड्डे डांबराने भरण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र पावसाळी डांबराने भरलेले खड्डे एक दोन पावसात पुन्हा उखडले जात आहेत.

शहरातील मारुतीआळी येथील रस्त्यावर गोखले नाका पासून ८० फूटी हायवे पर्यंत महिनाभरापूर्वी पावसाळी डांबराने रस्त्यावरील खड्डे भरले गेले होते. मात्र हे खड्डे आठवडाभरातच पुन्हा उखडले आणि त्यावर टाकलले खडी आणि डांबर यामुळे रस्त्यावर असे उंचवटे निर्माण झाले आहेत. गाडी चालवणे म्हणजे कधीही खड्यात पडून कपाळमोक्ष होईल अशी परिस्थिती आहे.

भरलेले खड्डे निदान गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी तरी सुस्थितीत राहावेत !
गणेशोत्सवाची धूम ज्या परिसरात मोठ्या प्रमाणात असते त्या शहराच्या खालच्या भागापासून खड्डे भरण्यास सुरूवात झाली आहे. मात्र हे भरलेले खड्डे निदान गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी तरी सुस्थितीत राहावेत, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 09/Aug/2025