सावर्डे : संगमेश्वर तालुक्याच्या उत्तरेकडील माखजन-आरवली हा मुख्य रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून दयनीय अवस्थेत असून, स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांचे हाल होत आहेत. मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबर, बाजूपट्ट्यांचा अभाव आणि पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याला पाणंदीचे स्वरूप आले आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा जनतेच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे बाबू मोरे यांनी दिला आहे.
आरवली-माखजन या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रमुख रहदारीच्या मार्गावर कोंडीवरे, माखजन, करजुवे, कासे, कळंबुशी, बुरंबाड, वडेरू धामापूर, सरंद, मावळंगे ही गावे येतात. माखजन ही प्रमुख बाजारपेठ असल्यामुळे या मार्गावर सतत वाहतूक सुरू असते. लोकांना गोवा-मुंबई महामार्गावर येण्यासाठी एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते. माखजन बसस्थानकातून आरवली व करजुवे या मार्गावर सतत एसटीच्या बस फेऱ्या असतात; मात्र रस्त्याची नियमित दुरुस्ती न झाल्याने वाहनांच्या दुरुस्तीवर अधिक खर्च करावा लागत आहे. कोंडीवरे येथील खड्यामध्ये माखजन येथील एका दुचाकीचाकीस्वाराचा अपघात होऊन हात निकामी झाला होता. रस्त्याच्या बाजूपट्ट्या गायब झाल्या आहेत. ठिकठिकाणी रस्ता तुटलेला असून, सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे. मार्गावरील कोंडीवरे, बुरंबाड, सरंद आदी ठिकाणी लांब व सलगपणे खड्डे पडल्यामुळे अपघाताचा धोका आहे. सध्या या मुख्य मार्गाची अवस्था बिकट झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या मार्गाची दुरुस्ती करण्याबाबत वारंवार आश्वासने मिळाली. ग्रामस्थांच्या तक्रारी व पत्रव्यवहार असूनही विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आंदोलन केल्यानंतरच खड्डे व रस्ता दुरुस्त करणार का ? – सुरेश भायजे, बहुजन विकास आघाडी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 09/Aug/2025













