वृद्ध निवृत्त शिक्षिकेच्या हत्या प्रकरणाचा छडा; पैशांसाठी ओळखीतल्या तरुणानेच केला खून

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथे घडलेल्या निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली असून, चिपळूण तालुक्यातील गोंधळे गावातील जयेश गोंधळेकर या तरुणानेच केवळ दागिने आणि पैशांसाठी त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

६८ वर्षीय वर्षा जोशी यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या गंभीर घटनेची नोंद घेत चिपळूण पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले. आरोपी जयेश गोंधळेकर हा मूळ गोंधळे गावातील जोशींच्याच कुटुंबातील असून, तो काही वर्षांपूर्वी साताऱ्यात नोकरी करत होता. सध्या तो चिपळूण परिसरात राहत होता; पण कोणताही कामधंदा करत नव्हता. त्यामुळे पैशांच्या गरजेतूनच त्याने हा क्रूर गुन्हा केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

ओळखीचाच व्यक्ती असल्याचा पोलिसांचा अंदाज

शिक्षिकेच्या घराचा दरवाजा तोडून नव्हे, तर आतून उघडल्यानंतर त्यांचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. त्यामुळे हा प्रकार कोणीतरी ओळखीच्या व्यक्तीनेच केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. आरोपी जयेशने खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी घरातील कॉम्प्युटर हार्डडिस्कही गायब केली होती.

एकाकी आयुष्य जगणाऱ्या वर्षा जोशी

वर्षा जोशी यांचे पती अकरा वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर त्या धामणवणे येथील घरात एकट्याच राहत होत्या. दोन वर्षांपूर्वी त्यांनी नर्मदा परिक्रमा केली होती आणि लवकरच त्या हैदराबादला फिरायला जाणार होत्या. त्यांची मैत्रीण त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करत होती, पण संपर्क न झाल्याने त्यांनी एका तरुणाला घरी जाऊन चौकशी करण्यास सांगितले आणि तेव्हाच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.