सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजापूरचा यंदा शताब्दी महोत्सव

राजापूर : स्वातंत्र्यपुर्व काळात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातून प्रेरणा घेवून तत्कालिन समाजधुरिणांच्या पुढाकारातून सन १९२६ साली राजापूरात सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी आपला शताब्दी महोत्सव साजरा करीत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजापूर या नावाने शहरातील मारूती मंदिर धर्मशाळेत हा उत्सव साजरा केला जातो. शताब्दी महोत्सवा निमित्त यावर्षी मंगळवार दि. २६ ऑगस्ट ते गुरूवार दि. ४ सप्टेंबर या काळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शतक महोत्सवी वाटचाल करताना राजापूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने उत्सवाचे पारंपारिक स्वरूप जपले आहे. मंगलमुर्तीची उंची तिचे मनोहारी रूप, राजापुरातील प्रत्येक वाडीवाडीचा सहभाग वैशिष्ठ्य पूर्ण ठरणार आहे. या वैशिष्ट्यासह वर्गणीसाठी प्रत्येक वाडीत फिरणारी सिलबंद दानपेटी, मूर्तीदाता सोडत, स्थानिक कलाकारांना दिलेले व्यासपीठ, विसर्जन मिरवणूक मार्गावर काढली जाणारी रांगोळी, ढोलमेळ, लेझिम पथक, युध्दकला प्रात्यक्षिक आणि पालखीतून जाणारे मंगलमूर्ती अशी ही या सार्वजनिक गणेशोत्सवाची वैशिष्टय आहेत. याही वर्षी नेहमीच्या कार्यक्रमाबरोबरच शताब्दी वर्ष असल्याने गणेशयाग व शहरवासीय तसेच गणेशभक्तांसाठी महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.

मंगळवारी दि. २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता श्रींची आगमन मिरवणूकीने शताब्दी महोत्सवाची सुरूवात होणार आहे. तर बुधवार २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना, गुरूवारी २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता धोपेश्वरघाटी मित्रमंडळाच्या आरत्या, ६ वाजता दिवटेवाडी धूतपापेश्वर प्रासादिक मंडळ यांचे भजन, शुक्रवार २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता हनुमानगल्ली मित्रमंडळाची आरती, ७ वाजता कोंढेतड महापुरूष भजन मंडळाचे भजन, रात्री ८ वाजता गायक प्रशांत मेस्त्री यांची अभंग, नाटयगीत, भक्तीगीतांची मैफिल होणार आहे.

शनिवार ३० ऑगस्ट रोजी सायं. रूमडेवाडी मित्तमंडळाच्या आरत्या, सायं.७ वाजता समर्थ महिला भजन मंडळाचे भजन, रात्रौ ८ वाजता मारूती प्रसन्न् भजन मंडळ आंबेवाडी येथील बुवा विजय बोळे यांचे भजन, रात्री ९.३० वाजता संयोजिका सौ. वसुंधरा मालपेकर यांचा सुश्राव्य गीतांचा कार्यक्रम बालसुमन होणार आहे. रविवार ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता महिलांचे अथर्वशीर्ष पठण संयोजक ललीता भावे, सायंकाळी ५ वाजता हरिहर भजनी मंडळ ‘शिवाजीनगर यांचे भजन, सोमवारी १ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता संयोजक गुणे परिवार श्री सत्यनारायण महापूजा, ४ वाजता हळदीकुंकू व तीर्थप्रसाद, रात्री ९.३० वाजता संयोजक आशिष प्रभूदेसाई अभिरूची देवरूख प्रस्तुत सुगम संगीत, मंगळवार २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता महिलांच्या आरत्या, तर रात्रौ ९.३० वाजता गिरीष विचारे यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.

बुधवार ३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता संयोजक संसारे बंधू पुरूषांची सहस्त्रावर्तने, १० वाजता गणेशयाग, दुपारी १२ वाजता गणेशयाग पूर्णाहूती, अभिषेक व महाप्रसाद, ५ वाजता राधेश्याम भजनी मंडळाचे भजन संयोजिका संजिवनी मालपेकर, ६ वाजता पवार मंडळ दिवटेवाडी यांचे भजन, ७ वाजता खंडेवाडी धूतपापेश्वर यांचे भजन, रात्री ८ वाजता हरडकरांचे ढोलावरचे भजर, रात्री ९ वाजता संयोजक प्रदीप चव्हाण यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम तर गुरूवारी ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून श्रींची सवाद्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा शताब्दी वर्ष साजरे करीत असताना या शंभराव्या उत्सवात श्रींची मूर्ती देण्याचा बहुमान सोडत पध्दतीने हर्डी येथील कु. गायत्री प्रभाकर पड्यार हिला मिळाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:52 11-08-2025