राजापूर तालुक्यात हातभट्टी आणि गोवा बनावटीची दारू जप्त; एकावर गुन्हा दाखल

राजापूर – राजापूर तालुक्यातील कळसवली येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूसह गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी घडली. राजापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई आकाश यशवंत वळवी (वय ३१) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना कळसवली येथील एका व्यक्तीकडे बेकायदेशीर दारूसाठा असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोतापूर बौद्धवाडी येथील बौद्ध विहारामागील एका घराला लागून असलेल्या तात्पुरत्या पडवीवर छापा टाकला.

छाप्यादरम्यान जनक आत्माराम जाधव (वय ४५, रा. कोतापूर बौद्धवाडी) याच्या ताब्यातून विविध प्रकारची दारू जप्त करण्यात आली. यामध्ये, ‘Haywards Fine Whisky’ या गोवा बनावटीच्या १८० मिलीच्या ८१ सीलबंद बाटल्या (किंमत २४३० रुपये) आणि ‘Black Deluxe Whisky’च्या १८० मिलीच्या ११ सीलबंद बाटल्या (किंमत ७३९ रुपये) आढळून आल्या. याव्यतिरिक्त, १० लिटर मापाच्या एका कॅनमध्ये सुमारे १०५० रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारूही जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या दारूचा एकूण साठा ४२१९ रुपये किमतीचा आहे.

आरोपी जनक जाधव याने ही दारू बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी बाळगल्याचे पोलिसांना आढळले. १० ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.०९ वाजता त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) नुसार गुन्हा (गु.र.नं. १४५/२०२५) दाखल करण्यात आला आहे. राजापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:01 11-08-2025