रत्नागिरी: रत्नागिरी हरचेरी देवधे राज्य महामार्ग क्रमांक १६५ वर टिके शिंदे वाडी आणि चांदेराई धरणासमोर रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, पादचारी आणि शाळकरी विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावरून वाहन चालवणे अत्यंत अवघड झाले असून, अनेक दुचाकीस्वार खड्ड्यांमुळे पडून जखमी झाले आहेत.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत भारतीय जनता पार्टी दक्षिणचे अध्यक्ष दादा दळी आणि उत्तरचे अध्यक्ष विवेक सुर्वे यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ओठवणेकर यांची भेट घेतली. त्यांनी रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल सविस्तर माहिती दिली आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
ओठवणेकर यांनी या समस्येची गांभीर्याने नोंद घेत, तात्काळ उपविभाग क्रमांक ४ चे शाखा अभियंता कांबळे यांना बोलावून घेतले. त्यांना सदर खड्डे त्वरित भरण्याचे आदेश दिले. बांधकाम विभागाच्या या तात्काळ प्रतिसादाबद्दल दादा दळी आणि विवेक सुर्वे यांनी समाधान व्यक्त केले आणि त्यांचे आभार मानले. सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरच रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











