खेड – खेड तालुक्यातील भोस्ते घाटात १० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री उशिरा एक कंटेनर आणि एका टाटा अल्ट्रोज गाडीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालक शौकीन खुर्शीद खान (वय ३३, रा. अलवर, राजस्थान) यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर चालक शौकीन खुर्शीद खान हा मुंबई-गोवा हायवेवरून मुंबईच्या दिशेने जात होता. भोस्ते घाट येथे आल्यावर, त्याच्या ताब्यातील कंटेनर (क्र. MH 43/CK 4208) ने एका टाटा अल्ट्रोज गाडीला (क्र. MH 08/AX 9348) मागून जोरदार धडक दिली. या धडकेत अल्ट्रोज गाडीचे मोठे नुकसान झाले.
धडक दिल्यानंतर कंटेनरने घाटातील वळणावर असलेल्या सिमेंटच्या संरक्षण भिंतीला धडक दिली. त्यानंतर कंटेनर सुमारे ८० मीटर पुढे जाऊन थांबला. अपघातामुळे घाबरलेल्या कंटेनर चालकाने गाडीतून बाहेर उडी मारली. मात्र, दुर्दैवाने तो गाडीच्या समोरील चाकाखाली आला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी टाटा अल्ट्रोज गाडीचे मालक रवींद्र हरावडे (वय ४९, रा. खेड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 12-08-2025












