रत्नागिरी : महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू झाल्यापासून गोरगरीब, सर्वसामान्य गरजू रुग्णांना जीवनदायी ठरली असून लाखोंच्या संख्येने रुग्ण या योजनेतून शस्त्रक्रिया करून घेत आहेत. मात्र किडनी प्रत्यारोपण महागड्या शस्त्रक्रिया अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी खासगी रूग्णालयात १० लाखांचा खर्च येत होता. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडत नव्हते. याचाच विचार करून राज्य सरकारने आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेत महागड्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा समावेश केला असून या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत.
कॅन्सर आजारावरील शस्त्रक्रियांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या वतीने एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सर्वच नागरिकांना ५ लाखांपर्यंत उपचार मोफत केले होते. त्यामुळे रुग्णांकडून विविध उपचार करण्यात आले.
या योजनेचा मोठा लाभ रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्याप्रमाणात घेतला आहे. मात्र महागड्या शस्त्रक्रिया या योजनेत नसल्यामुळे रूग्णांना खासगी किंवा दुसऱ्या रुग्णालयात जावून करावे लागत होते. मात्र ते आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्यांना परवडत नसल्यामुळे कित्येकजण इलाज करण्यास पैशाची जुळवाजुळव किंवा काही कारणास्तव पुढे ढकलत होते. महागड्या शस्त्रक्रिया राज्य सरकारने आता महात्मा फुले योजनेत समाविष्ट केल्या असून आता रूग्णांना या योजनेतून मोफत किडनी प्रत्यारोपण करता येणार आहे. महागड्या शस्त्रक्रियांची उपचार प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने केली जाते.
या योजनेतून इतके उपचार मिळतायेत
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सामान्य आजारांपासून ते गंभीर आजारापर्यंत हृदयविकार, कर्करोग, मूत्रपिंड विकार, मधुमेह, बालरोग शस्त्रक्रिया, नेत्ररोग, जठर, आतड्यांचे विकार, स्त्रीरोग शस्त्रक्रिया अशा विविध ९९६ प्रकारच्या गंभीर व खर्चिक शस्त्रक्रिया आणि १२१ शस्त्रक्रिया पश्चात सेवांचा लाभ घेउ शकतात.
अवयव प्रत्यारोपणासाठी ५ लाख
महात्मा फुले योजनेतून अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी रूग्णालयांना ५ लाख रूपयांचे पॅकेज शासनाकडून देण्यात येणार आहे.
ही कागदपत्रे लागणार
या योजनेंतर्गत मोफत उपचारासाठी रुग्णाचे ऑनलाईन झालेले रेशन कार्ड, आधार कार्ड, डॉक्टरांचे प्रमाणपत्र तसेच रुग्णाचा कायम रहिवासी दाखला, फोटो इ. कागपत्रे ऑनलाईन सबमिट करावे लागणार आहे.
जनआरोग्य महात्मा फुले योजनेतून महागड्या शस्त्रक्रिया व उपचार होणार आहेत. यामध्ये किंडनी प्रत्यारोपणाचा समावेश आहे. यासह विविध आजारांचा समावेश आहे. रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा-डॉ. भास्कर जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 12/Aug/2025












