सावर्डेत भक्ष्याच्या शोधात बिबट्या मानवीवस्तीत

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील वालावलकर रुग्णालय मार्गावर समर्थ संकूल या गृहनिर्माण संस्थेच्या मानवीवस्तीत भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या रात्री दीडच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. ही घटना रविवारी सकाळी उघड झाली. त्याच रात्री वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी संकुलात प्रवेश करताना त्यांनीही हा बिबट्या पाहिला. त्यांच्या मोटर सायकलचा आवाज व प्रकाश पाहिल्यानंतर त्याने प्रवेशद्वारातून बाहेर धूम ठोकली.

हा बिबट्या तीन ते साडेतीन फूट उंचीचा असावा तसेच परिसरातील संकुलात व रस्त्यावर कुत्र्यांचा वावर असल्याने त्यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने तो संकुलात घुसला असावा, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. मोकाट गुरे वा कुत्रे परिसरातील गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीखाली आडोश्याला रात्री विश्रांतीसाठी बसलेले असतात. त्यांना लक्ष्य करण्यासाठीच या बिबट्याने चक्क संस्थेच्या आवारात घुसून भक्ष्याचा शोध घेतला. हा बिबट्या साधारण पाच ते सात मिनिटे संकुलात भक्ष्य शोधत होता; मात्र त्याच्या तोंडाला काहीच लागले नसल्याचे स्पष्ट झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 12/Aug/2025