चिपळूण : पेठमाप, गोवळकोट भागातील पाच बौद्धवाड्यांच्या समस्या सुटणार

चिपळूण : शहरातील पेठमाप व गोवळकोट भागातील पाच बौद्धवाड्यांच्या समस्यांबाबत मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शक्य ती कामे तातडीने मंजूर करून लगेच सुरू करण्याचे संबंधित विभागांना आदेश दिले. तसेच, मोठ्या निधीसाठी आमदारांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला जाईल, असेही आश्वासन दिले,

शहरातील पेठमाप व गोवळकोट भागातील पाच बौद्धवाड्यांच्या स्मशानभूमीतील गैरसोयी तसेच अन्य विकासकामांच्या मागण्यांच्या अनुषंगाने महायुती पदाधिकारी आणि पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नागरिकांच्या तातडीच्या गरजांवर सविस्तर चर्चा होऊन काही कामांना तत्काळ मंजुरी देण्यात आली.

गेल्या काही दिवसांपूर्वी पाच बौद्धवाड्यांतील बांधवांनी दफनभूमीतील गैरसोयी, पायाभूत सुविधांची कमतरता आणि काही प्रलंबित विकासकामे लवकर मंजूर करण्याची मागणी करत स्वातंत्र्यदिनापासून अन्नत्याग उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची गंभीर दखल आमदार शेखर निकम यांनी घेतली. त्यांनी महायुतीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कदम बौद्धवाडीत जाऊन नागरिकांची बैठक घेतली आणि समाजाच्या अडचणी जाणून घेतल्या.

या वेळी आमदार निकम यांनी आमदार निधीतून शक्य असलेली विकासकामे तातडीने हाती घेण्याचे आश्वासन दिले. राज्य सरकारमार्फत कराव्या लागणाऱ्या कामांसाठी स्वतः पाठपुरावा करून ती कामे मंजूर करून देण्याची ग्वाही दिली. बैठकीत बौद्ध समाजाच्या अडचणींची माहिती घेतल्यानंतर या बैठकीस पाच वाड्यांतील पंचप्रमुख, त्यांची समिती तसेच बौद्ध समाजबांधव उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 12/Aug/2025