२१ व्या शतकातही महिलेच्या पायात अदृश्य साखळ्या : संपदा जोगळेकर-कुळकर्णी

चिपळूण : कलेने मला आई म्हणून, पत्नी म्हणून आणि मुलगी म्हणून आत्मभान दिलं. आत्मभान म्हणजे स्वतःला मोठं करणं नव्हे तर त्याला सतत कामातून उजाळा देणं होय. आत्मभानाची पणती कायम पेटती ठेवायला हवी. २१ व्या शतकातही महिलेच्या पायात अदृश्य साखळ्या आहेत, याची खंत आहे. अशी भावना लेखिका, कवयित्री, दिग्दर्शिका आणि अभिनय क्षेत्र सोडून आनंदाची शेती करणाऱ्या संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी व्यक्त केली.

शहरातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात सुरू झालेल्या श्रीकृष्ण व्याख्यानमालेचे यंदाचे ९७ वे वर्ष असून, यंदा सर्व महिला व्याख्यात्यांचा सहभाग आहे. रविवारी व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी ‘कलेतील आत्मभान’ या विषयावर संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी मनोगत मांडले. त्या म्हणाल्या, व्यावसायिक रंगभूमीवर १९९१मध्ये नीना कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पदार्पण केले. ‘आईचं घर उन्हात’ हे नाटक करत असताना कुलकर्णी यांनी रंगभूमीकडे पाहण्याचं खरं आत्मभान दिलं. कलाकार कधी थांबत नाही; मात्र ‘आत्मभान’ हा फसवा शब्द असून, खरी गरज रंगभूमीच्या आत्म्याचं भान राखण्याची आहे. विविध नाटकांमधील अनुभवातून मला सुंदर बोलण्याची जाण आली आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमधून मी निवेदनाकडे वळले.

छान शब्दसंपदा आणि दाद यामुळे मी सूत्रसंचालिका झाले. मी केवळ सोशल मीडियावर पोस्ट टाकणारी, रिल्स बनवणारी कलाकार नाही तर कलेचा गांभीयनि विचार करणारी चैतन्यशील कलाकार आहे. ‘क’ म्हणजे क्रिया आणि ‘ल’ म्हणजे लावण्य, म्हणजेच सौंदर्यपूर्ण क्रिया हाच कलेचा अर्थ.

सेलिब्रिटी असूनही पाय जमिनीवर ठेवण्याचं व कलेतून आनंद मिळवण्याचे संस्कार आईने दिल्याचे सांगून त्यांनी, ‘चेहऱ्यावरचं हसू हे कलेतून आलेल्या आनंदाचं प्रतिबिंब असतं,’ असं मत व्यक्त केलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 12/Aug/2025