जैतापूर : जैतापूर-मीठगवाणे येथील सागरी महामार्गावर आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक महिला ठार झाली असून, अन्य सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
अपघात कसा घडला?
प्राथमिक माहितीनुसार, वाघराण येथून बागकामासाठी जानशी पठाराकडे जाणाऱ्या महिलांना घेऊन जाणारा एक टेम्पो समोरून जाणाऱ्या लक्झरी बसला ओव्हरटेक करत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो रस्त्याच्या कडेला सुमारे १०० ते १५० फूट फरफटत जाऊन पलटी झाला. या भीषण अपघातात टेम्पोमधील सर्व महिला आणि एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली. तसेच, टेम्पोचालक आणि केबिनमधील इतर पुरुष प्रवासीही जखमी झाले आहेत.
बचावकार्य आणि उपचाराची माहिती
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी सर्व जखमींना जैतापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला.
जखमी आणि मृतांची नावे
या अपघातात शीतल सोमा जाधव (वय ६०) या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, अविता बाबन जाधव (वय ६०), शिल्पा शिवाजी आग्रे (वय ६५), रंजना रविकांत राणे (वय ४०), संतोष आबा नाचणेकर (वय ३८), प्रज्ञा प्रकाश डिंगवकर (वय ५०) आणि वंदना वसंत जाधव (वय ४०) या सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच सागरी पोलीस ठाण्याचे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य पूर्ण केले. सागरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:07 PM 13/Aug/2025














