मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अजून 14 दिवसांचा वेळ, चर्चेतून मार्ग निघू शकतो, मंत्री सरनाईकांनी घेतली जरांगेंची भेट

Pratap Sarnaik : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन आक्रमक झाले आहेत. त्यांनी आता थेट सरकारविरोधात आरपारची लढाई छेडली आहे. येत्या 29 ऑगस्टला मनोज जरांगेंनी आरक्षणासाठी राज्यभरातल्या मराठा समाजालासोबत घेत मुंबईत मोठं आंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे.

याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला अजून 14 दिवसांचा वेळ आहे. चर्चेतून मार्ग निघू शकतो असे मत प्रताप सरनाईक यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या लातूर येथील भेटीनंतर व्यक्त केलं आहे.

मनोज जरांगे पाटलांनी गणेशाच्या दर्शनासाठी मुंबईत यावं, आंदोलनाला येऊ नये

मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत गणेशाच्या दर्शनाला यावं, आंदोलनाला मुंबईत येऊ नये ही मंत्री म्हणून माझी भूमिका असल्याचे प्रताप सरनाईक म्हणाले. मनोज जरांगे पाटील आणि सरकारमध्ये चर्चेतून मार्ग अजूनही निघू शकतो असे सरनाईक म्हणाले. प्रताप सरनाईक यांनी आज लातूरमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आता राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीचा जोर वाढला असून 29 ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर होत असलेल्या आंदोलनाची मराठवाड्यासह राज्यात ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू केली आहे.

विषय कोणताही असो, जितेंद्र आव्हाडांना उड्या मारायची सवयच

विषय कोणताही असो जितेंद्र आव्हाड उडी घेतात, त्यांना उड्या मारायची सवयच आहे. जसं राऊतांना सकाळी सकाळी दुसरं काही दिसत नाही असे म्हणत प्रताप सरनाईक यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. जितेंद्र आव्हाड यांच्या तुळजापुरातील राड्यानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुळजाभवानी मंदिर हा पवित्र विषय आहे. त्यावर कोणी राजकारण करु नये, विधानसभेचे ते जबाबदार आमदार आहेत, त्रुटी असतील तर त्यांनी पत्र द्यावे असे मत प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले.

लहानपणी आम्ही एकत्र तुळजाभवानीच्या दर्शनाला यायचो

जितेंद्र आव्हाडही तुळजाभवानीचे निस्सिम भक्त आहेत. लहानपणी आम्ही एकत्र तुळजाभवानीच्या दर्शनाला यायचो असे प्रताप सरनाईक म्हणाले. जितेंद्र आव्हाड कधी आमदार होतील यासाठी तुळजाभवानीकडे आम्ही साकडं घालायचो. तुळजाभवानी मंदिरातील पाठीमागच्या साईटला चिंतामणीकडे आम्ही कौल मागायचो. मात्र पैसे मी लावायचे अशी मिश्किल टीका सरनाईक यांनी आव्हाडांवर केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 15-08-2025