कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला; धरणाचे सहा दरवाजे ३ फुटांपर्यंत उघडणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

सातारा, १८ ऑगस्ट:

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज (दि. १८) सायंकाळी ४ वाजता धरणातून मोठा विसर्ग करण्यात येणार आहे. धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांवरून थेट तीन फुटांपर्यंत उघडण्यात येणार असून, कोयना नदीपात्रात एकूण २१,३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होईल. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कोयना धरण व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आज सायंकाळी ४ वाजता धरणाचे सहा दरवाजे ३ फुटांपर्यंत उचलून त्यातून १९,२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जाईल.

यासोबतच, धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून, त्यातूनही २,१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे दरवाजातून आणि पायथा विद्युतगृहातून असा एकूण २१,३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत होणार आहे.

नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार असल्याने, प्रशासनाने कोयना नदीच्या काठावर असलेल्या सर्व गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, आपली गुरेढोरे नदीकाठाहून सुरक्षित ठिकाणी न्यावीत आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:19 18-08-2025