रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणीचे अनेक प्रकार घडतात. रिक्षाचालक किंवा बस वाहतूकदारांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तनाचे प्रकारही घडतात.
आता प्रवाशांना त्याबद्दलची थेट तक्रार व्हॉट्सअॅपवर करता येणार आहे. या संदर्भातील तक्रार नागरिकांनी 8275101779 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर वाहन आणि प्रवासाच्या तपशिलासह करावी, असे आवाहन रत्नागिरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षा संघटना, बस वाहतूकदार संघटना यांच्यासोबत वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस, तसेच रेल्वे पोलीस यांची संयुक्त बैठक पार पाडली. त्यावेळी ते बोलत होते. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर, तसेच कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक उपस्थित होते. त्याचप्रमाणे पोलीस उप निरीक्षक (वाहतूक शाखा) शरद घाग, पोलीस उपनिरीक्षक (महामार्ग पोलीस) चंद्रशेखर जाधव, वरिष्ठ रेल्वे पोलीस निरीक्षक सतीश विभूते, विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद यादव यांच्यासह सर्व रस्ता कंत्राटदारांचे प्रतिनिधी, बस वाहतूकदार संघटना व रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी करपे म्हणाले की, सर्व रिक्षाधारकांनी त्यांच्या रिक्षा स्टँडवर शिस्तबद्ध पद्धतीने वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची खबरदारी घेऊन लावाव्यात. तसेच अवाजवी भाडे आकारणी करू नये व प्रवाशांशी कोणत्याही प्रकारचे उद्धट वर्तन करू नये. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन वाहतूक करू नये. सर्व वाहनमालकांनी वाहनाची सर्व कागदपत्रे वैध आहेत, याची खात्री करावी. बस वाहनधारकांनी बसमध्ये आपत्कालीन दरवाजा, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटी सुस्थितीत असल्याची खात्री करावी. बसचालकांनी मद्यप्राशन करून बस चालवू नये. तसेच त्यांना पुरेशी विश्रांती व झोप मिळेल याची काळजी बसमालकांनी घ्यावी. बसमालकांनी प्रवाशांकडून अवाजवी भाड्याची मागणी करू नये.
राज्य परिवहन महामंडळाच्या चालकांनी एसटी बस चालवताना सुरक्षिततेविषयी पुरेशी काळजी घ्यावी. वाहतुकीची कुठेही कोंडी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. परिवहन महामंडळाने रेल्वेच्या वेळापत्रकाशी सुसंगत वेळेत एसटी बसच्या रेल्वे स्टेशनसाठीच्या फेऱ्यांचे नियोजन करावे, अशाही सूचना करपे यांनी यावेळी दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 21-08-2025














