सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून रॅगिंग झाली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

याबाबत रॅगिंग झालेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे लेखी तक्रार केली असून, या प्रकाराला अधिष्ठाता डॉ. मनोज जोशी यांनी दुजोरा दिला आहे. तसेच येत्या मंगळवारी अँटी रॅगिंग कमिटीची बैठक घेऊन या तक्रारीवर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

या महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना वरिष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या रॅगिंगला सामोरे जावे लागले. रॅगिंगबाबत संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा रॅगिंग कमिटी अध्यक्ष डॉ. मनोज जोशी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. हा प्रकार सोमवार, मंगळवार या कालावधीत घडला आहे. प्राथमिक माहितीनुसार, तक्रारदार विद्यार्थ्यांना त्यांच्या रूमवर जाऊन आपल्या रूमवर घेऊन येत रॅगिंग केली असल्याचे समोर येत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची रॅगिंग झाली असल्याची तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली आहे. याबाबत अँटी रॅगिंग कमिटीच्या बैठकीत चर्चा करून पुढील कारवाई केली जाईल. – डॉ. मनोज जोशी, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 19-10-2024