चिपळूण : खेंड-कांगणेवाडीत दरड कोसळल्याची घटना

चिपळूण : काही दिवसांपूर्वी खेंड-कांगणेवाडी येथे संरक्षक भिंतीसह दरड कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर चार दिवसांपूर्वी याच भागातील जाखमाता मंदिरानजीक आनंदराव पवार महाविद्यालयाच्या खालच्या बाजूस दरड कोसळून पाच ते सहा घरांना व काही इमारतींना फटका बसला. एका पाठोपाठ एक घटना घडत असल्याने येथील रहिवासी हैराण झाले आहेत.

शहरातील खेंड-कांगणेवाडी येथे संरक्षक भिंतीसह दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर पाच कुटुंबांसह एका बहुमजली इमारतीतील रहिवाशांनाही स्थलांतरित करावे लागले होते. यामध्ये खेंड कांगणेवाडी येथील जाधव, राणिम आणि शिंदे कुटुंबांना तातडीने स्थलांतरीत करावे लागले. तसेच दरडीच्या पायथ्याशी असलेल्या यतीन कानडे, प्रभूलकर व शुभम अपार्टमेंटमधील रहिवाशांना धोका निर्माण झाल्याने त्यांनाही स्थलांतरित केले होते. आता चार दिवसांपूर्वी येथे झालेल्या पावसात शहरातील खेंड जाखमाता मंदिरानजीकच्या आनंदराव पवार महाविद्यालयाच्या खालील बाजूस असलेली दरड अचानक कोसळली. या दरडीमुळे यतीश कडवईकर यांच्यासह लगतच्या पाच घरांना मोठा फटका बसला. या पाचही घरांमध्ये गटाराचे पाणी शिरले आणि घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. शिवाय लगतच्या इमारतींनाही त्याची झळ बसली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 25/Aug/2025